नाशिक, (प्रतिनिधी) १९ मार्च - शेअर मार्केट आणि गुंतवणुकीवर दरमहा ३ ते ७ टक्के भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील पाच जणांना तब्बल ६० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश सुरेश जानवलकर, युवराज सुरेश जानवलकर, संगिता सुरेश जानवलकर आणि सुरेश बाबुराव जानवलकर (सर्व रा. मंगलमूर्ती नगर, सिडको) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप प्रभुनाथ सिंग (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
'फ्युचर स्टॉक मार्केट'चा बनाव
संशयित यश आणि युवराज या जानवलकर बंधूंनी २०२३ मध्ये 'फ्युचर स्टॉक मार्केट अॅनालिसिस' नावाची एक बनावट कंपनी स्थापन केली होती. या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ७ टक्के निश्चित परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी गुंतवणूकदारांना दाखवले. संशयितांनी गुंतवणुकीची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवून घेतली. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीचे काही महिने त्यांनी गुंतवणूकदारांना परतावा देखील दिला. मात्र, त्यानंतर परतावा आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ सुरू केली.
पाचजणांची फसवणूक
या फसवणुकीत फिर्यादी संदीप सिंग यांच्यासह योगेश परदेशी, राहुल प्रजापती, हेमांगिनी मटाले आणि अश्विन खैरणार या पाच जणांची एकूण ५९ लाख ९८ हजार ८८६ रुपयांची फसवणूक झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर पीडितांनी पोलिसांत धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.