इन्स्टाग्रामवरील मैत्री... अल्पवयीन मुलीला तपोवनात घेऊन गेला अन्....

Share:
Main Image
Last updated: 19-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ मार्च - सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीस दमदाटी करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजल दादाभाई शेख (१९, रा. शिरसगाव शिंगणापूर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. आडगाव शिवारात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

धमकी देऊन भेटीसाठी बोलावले
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि संशयित फैजल यांची २०२४ मध्ये इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यांच्यात नेहमी चॅटिंग होत असे. मंगळवारी (दि. १७) संशयिताने पीडितेशी संपर्क साधून आपण नाशिकला येत असल्याचे सांगितले व तिला भेटण्यास बोलावले. मात्र, मुलीने त्याला भेटण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने "तुझ्या घरी येऊन आपल्या प्रेमप्रकरणाची वाच्यता करेन," अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेली मुलगी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास निमाणी बसस्थानक येथे त्याला भेटण्यासाठी गेली.

Advertisement

तपोवनात नेऊन विनयभंग
संशयित फैजल याने पीडितेस निमाणी येथून तपोवनातील रामसृष्टी परिसरात नेले. या ठिकाणी एकांतात गप्पा मारत असताना त्याने मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने या प्रकाराला कडाडून विरोध केला असता, संशयिताने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेनंतर पीडितेने घर गाठून कुटुंबीयांना सर्व आपबिती कथन केली.

पोलीस तपास सुरू
कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेने आडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने दखल घेत फैजल शेखविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख करीत आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया वापरताना अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे धोक्याचे ठरू शकते. पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाइन हालचालींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Comments

No comments yet.