नाशिक, (प्रतिनिधी) १९ मार्च - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्यातील गणेशपूर (सुकी) गावाजवळ रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघात व अनधिकृत मार्गक्रमण टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने गणेशपूर येथे 3.6 मीटर उंचीसह रोड अंडर ब्रिज (RUB) बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयाकडून दि. ०७.११.२०२५ रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना हे अंडरपास मंजुरीचे पत्र पाठविण्यात आले असून यामध्ये सदर काम दौंड मनमाड रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे.
गणेशपूर (सुकी) परिसरात रेल्वे ट्रॅक ओलांडताना नागरिकांकडून होणाऱ्या अनधिकृत मार्गक्रमणामुळे अपघातांचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वाहतुकीची सोय सुधारण्यासाठी RUB उभारण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेत संबंधित प्रस्तावाचा विचार करून कामास मंजुरी दिली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे गणेशपूर व परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.