नाशिक, (प्रतिनिधी) १८ मार्च - नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम (लघुपाटबंधारे) विभागात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. सिमेंट बंधारा दुरुस्तीच्या कामाचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता ठाकरे वैशाली यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी अरुण धारणकर यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदार हे 'चे. त्रंबकराज कृपा मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी (पिंपळद, ता. त्रंबकेश्वर)' या संस्थेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संस्थेने त्रंबकेश्वर तालुक्यातील गडदवणे आणि तुंगारपाडा (ओझरखेड) येथे सिमेंट कॉक्रीट बंधारा दुरुस्तीची दोन कामे पूर्ण केली होती.
गडदवणे येथील काम: निव्वळ देय रक्कम ₹८,०९,१३१/-
तुंगारपाडा येथील काम: निव्वळ देय रक्कम ₹८,१०,१५९/-
एकूण देयक रक्कम: ₹१६,१९,२९०/-
या १६ लाख १९ हजार रुपयांच्या बिलाची मंजुरी देण्यासाठी कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा अरुण धारणकर यांनी सुरुवातीला ७२,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोड आणि सापळा
तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती ५०,००० रुपये देण्याचे ठरले. आज, १८ मार्च रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला.
ठाकरे यांनी पंचांच्या उपस्थितीत ही ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
ठळक मुद्दे:
लाच घेणारे लोकसेवक: ठाकरे वैशाली (कार्यकारी अभियंता) व अरुण धारणकर (वरिष्ठ सहा. लेखा).
लाचेची मागणी: ७२,००० रुपये (तडजोडीनंतर ५०,००० रुपये).
कारवाईचे ठिकाण: लघुपाटबंधारे विभाग कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक.
कामे: गडदवणे व तुंगारपाडा येथील सिमेंट बंधारा दुरुस्ती.
या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.