नाशिक (प्रतिनिधी) दि. १८ मार्च २०२६
स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या आणि ज्योतिषविद्येच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा एक जुना फोटो समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, त्यामध्ये त्या खरातची 'पाद्यपूजा' (पाय धुताना) करताना दिसत आहेत. या फोटोमुळे महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखच अशा भोंदूगिरीला खतपाणी घालत होत्या का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने अशोक खरातविरुद्ध गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने खरातला बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान खरातच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये अनेक प्रतिष्ठित महिलांचे सुमारे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध
अशोक खरात हा केवळ मांत्रिक नसून त्याचे राजकीय वर्तुळात मोठे वजन होते. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये केवळ रुपाली चाकणकरच नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे बडे नेतेही त्याच्यासोबत दिसत आहेत. मात्र, चाकणकर यांचा पाय धुतानाचा फोटो समोर आल्याने विरोधकांनी त्यांना घेरले आहे.
सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावरून फेसबुक पोस्टद्वारे राज्य सरकार आणि चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "ज्या माणसावर महिलांच्या शोषणाचे आरोप आहेत, त्याच्या घरी जाऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतात, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे," अशा शब्दांत अंधारे यांनी टीका केली. तसेच, महिला आयोगाच्या पदाचा दुरुपयोग करून अशा गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना? अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा?
रुपाली चाकणकर यांनी नेहमीच महिलांवरील अत्याचाराविरोधात 'झिरो टॉलरन्स'ची भूमिका मांडली आहे. मात्र, एका बलात्कारी भोंदू बाबाच्या चरणी नतमस्तक होणारा त्यांचा हा फोटो त्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत यावर कारवाई होणार का आणि चाकणकर यावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.