नाशकात आत्महत्येचे सत्र सुरूच... १७ वर्षीय मुलासह युवकाचा समावेश

Share:
Last updated: 19-Mar-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), दि. १८ मार्च २०२६

शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. मृतांमध्ये एका १७ वर्षीय मुलाचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दोन्ही घटनांचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बेडरुममध्ये घेतला गळफास

पहिली घटना भाभानगर येथील नवशक्ती चौकात घडली. अविष्कार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सचिन रतन लोखंडे (३२) यांनी मंगळवारी (दि. १७) दुपारी अज्ञात कारणातून राहत्या घरातील बेडरुममध्ये पंख्याला साडी बांधून गळफास घेतला.

ही बाब त्यांचे बंधू सौरभ लोखंडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सचिन यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मुंबई नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत.

आठ दिवसांची झुंज अपयशी

दुसरी दुर्दैवी घटना पाथर्डी फाटा परिसरातील खंडेरावनगर येथे घडली. येथील लक्ष्मी नारायण हाईट्समध्ये राहणाऱ्या चिराग मोहन पडवड (१७) या अल्पवयीन मुलाने गेल्या मंगळवारी (दि. १०) रात्री आपल्या घरात गळफास घेतला होता.

Advertisement

त्याचे वडील मोहन पडवड यांनी त्याला तत्काळ वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या आठ दिवसांपासून चिराग मृत्यूशी झुंज देत होता, मात्र मंगळवारी रात्री उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. डॉ. साक्षी मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार गांगुर्डे तपास करीत आहेत.

 

तडीपाराच्या मुसक्या आवळल्या

हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई भारतनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समिर मुन्ना शहा (३० रा.मनपा शाळेमागे, भारतनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिरपाराचे नाव आहे. शहा याच्या गुन्हेगारी कृत्यास रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केलेली आहे.

 शहर आणि जिह्यातून त्यास हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना मंगळवारी (दि.१७) तो आपल्या घरात असल्याची माहिती मुंबईनाका पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून पूर्व परवानगी न घेता तो अपल्या घरात मिळून आला आहे.

याबाबत अंमलदार दिपक जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  हद्दपार आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार म्हैसधुणे तपास करीत आहेत.

 

Comments

No comments yet.