नाशिक (प्रतिनिधी), १८ मार्च २०२६
शहरात गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. ताज्या दोन घटनांमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची साडेचौदा लाख, तर एका महिला व्यावसायिकाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फॉरेक्स ट्रेडिंगच्या जाळ्यात व्यावसायिक
बोट ब्रो कंपनीच्या संचालकासह बँक खातेदारांवर गुन्हा एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला 'फॉरेक्स ट्रेडिंग'मध्ये मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख ५८ हजार ३४० रुपयांना लुटण्यात आले. सायबर भामट्यांनी २०२३ मध्ये युट्यूब आणि सोशल मीडियावरील 'झूम मीटिंग'द्वारे या व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला होता.
'बोट ब्रो' कंपनीचा संचालक लविश चौधरी ऊर्फ नवाब अली याने गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे स्वप्न दाखवले. त्याच्या भूलथापांना बळी पडून व्यावसायिकाने विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरले. मात्र, परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दागिने गहाण ठेवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक
पाथर्डी फाटा परिसरातील महिलेला साडेपाच लाखांचा फटका शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली भाविका मनीष भोजवाणी (रा. श्रीजी ॲनेक्स, पाथर्डी फाटा) या महिला व्यावसायिकेची ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. रंजना हंस नावाच्या संशयित महिलेने भोजवाणी यांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.
विशेष म्हणजे, संशयित महिलेच्या सल्ल्यानुसार भोजवाणी यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने सराफी पेढीत गहाण ठेवून ही रक्कम उभी केली होती. दीड वर्ष उलटूनही मुद्दल आणि नफा न मिळाल्याने अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर तपास करत आहेत.