सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा 'कॅप्टन' अशोक खरात जेरबंद...  महिला अत्याचाराचे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ...

Share:
Main Image
Last updated: 18-Mar-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १८ मार्च २०२६ -

मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे आणि सेलिब्रिटींचे भविष्य वर्तवणारे नाशिकमधील प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आणि सेवानिवृत्त कॅप्टन अशोक खरात यांना महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाशिक गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली असून, खरात यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ आणि अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. या तक्रारीची दखल घेत गुन्हे शाखेने तपास चक्रावून बुधवारी (१८ मार्च) पहाटे ३ वाजेच्या सुमारास खरात यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. अटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलिसांच्या हाती एक पेन ड्राईव्ह लागला. या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे समोर आले असून, पोलीस आता या व्हिडिओंची सत्यता आणि त्यातील पीडितांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

बड्या नेत्यांशी होते संबंध

अशोक खरात हे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराला भेट दिल्यानंतर खरात राज्यभर चर्चेत आले होते. अनेक मंत्री, बडे राजकीय नेते, उद्योजक आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकार त्यांच्याकडे भविष्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत. खरात यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

गुन्हे शाखेने खरात यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये आणखी काही महिलांची फसवणूक झाली आहे का? किंवा खरात यांनी या व्हिडिओंनी कुणाला ब्लॅकमेल केले होते का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत. एका नामांकित व्यक्तीचे असे 'काळे कारनामे' समोर आल्याने नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Advertisement

Comments

No comments yet.