अनधिकृत नर्सिंग होमची आता खैर नाही... राज्य सरकारचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 18-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १८ मार्च - राज्यातील अनधिकृत आणि विनानोंदणी सुरू असलेल्या नर्सिंग होमवर कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भाई जगताप, संजय खोडके, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम, १९४९ तसेच संबंधित नियमांनुसार राज्यात खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमची नोंदणी व तपासणी केली जाते. मात्र काही ठिकाणी विनानोंदणी किंवा अनधिकृत नर्सिंग होम सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याने या प्रकरणावर राज्यस्तरावर समन्वयाने कारवाई करण्याची गरज आहे.

Advertisement

यासाठी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव यांच्या सहअध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीत विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच आवश्यक ते इतर अधिकारीही सहभागी असतील. ही समिती राज्यातील सर्व नर्सिंग होमचा आढावा घेऊन अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाई करेल आणि संपूर्ण अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर मांडेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

सध्याच्या कायद्यातील तरतुदींमध्ये दंड आणि शिक्षा मर्यादित असल्याने ती अपुरी ठरत आहे. त्यामुळे कठोर कारवाईसाठी संबंधित कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्याचाही प्रस्ताव समितीमार्फत तयार करण्यात येईल

याशिवाय मुंबई महानगरपालिकेलाही सर्वेक्षण करून अनधिकृत नर्सिंग होमची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. राज्यातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अनधिकृत नर्सिंग होमवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ही समिती ९० दिवसांत अहवाल सादर करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

No comments yet.