मुंबई, (प्रतिनिधी) १८ मार्च - सुवर्णकारांच्या विविध समस्यांबाबत लवकरच संबंधित बँकिंग संस्था व सुवर्णकार संघटनांची बैठक घेऊन मार्गदर्शक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, राज्यातील विविध राष्ट्रीय, खासगी, ग्रामीण तसेच सहकारी बँकांमार्फत सोन्यावर कर्ज दिले जात असल्याने या संदर्भात सर्व संबंधितांची अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्याच्या आत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी गोल्ड व्हॅल्यूअरची नियुक्ती केली जाते. मात्र त्यांच्या मानधनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेक सुवर्णकारांना अडचणी येत असल्याने सुवर्णकारांच्या सुरक्षिततेसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्या जिल्हास्तरावरही समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या माध्यमातून बँकर्स असोसिएशन तसेच सुवर्णकार संघटनांचा समन्वय साधून गोल्ड व्हॅल्यूअर नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांन सहभागी घेतला.