नाशिक, (प्रतिनिधी) १७ मार्च - नाशिक-दिंडोरी रोडवरील कॅम्ब्रीज शाळा परिसरात शुक्रवारी रात्री एका भरधाव अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील आंबापाणी (पो. भुवन) येथील रहिवासी असलेले रोहिदास रूपजी फडवळ (३६) आणि त्यांच्या पत्नी रेखा रोहिदास फडवळ (३१) हे शुक्रवारी (दि. ३) रात्री आपल्या पल्सर दुचाकीने (क्र. MH 15 KH 2898) नाशिककडून दिंडोरीच्या दिशेने जात होते. म्हसरूळ परिसरातील कॅम्ब्रीज स्कूलजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
मदत आणि उपचार
ही धडक इतकी भीषण होती की, फडवळ दांम्पत्य रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रोहिदास फडवळ यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी रेखा या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी मृताचे नातेवाईक आबाजी हरी फडवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंदृपकर करीत आहेत.
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने ५५ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात पेठरोड भागात झाला. शाळेचे विद्यार्थी रस्ता ओलांडत असतांना अचानक ब्रेक दाबल्याने ही घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्यामराव अर्जुन भोये (रा.दळवट ता. कळवण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. भोये सोमवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास फुलेनगर कडून पेठफाट्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाट परिसरातील उन्नती शाळे समोर विद्यार्थी रस्ता ओलांडत असल्याने त्यांनी अचानक दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार घडला. भरधाव दुचाकी घसरल्याने भोये रस्त्यावर पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने मित्र तुषार पवार यांनी त्यांना तातडीने संदर्भ सेवा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. राजेंद्र धादवड यांनी तपासून मृत घोषीत केले.