नाशिक, (प्रतिनिधी) १७ मार्च - नाशिक शहरात चैनस्नॅचर पुन्हा सक्रिय झाले असून, रविवारी आणि सोमवारी अशा दोन दिवसांत पाच वेगवेगळ्या भागांत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. आडगाव, अंबड, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांत याप्रकरणी जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. हिरावाडी परिसरात लग्नकार्यासाठी जाताना लूट
पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हिरावाडी येथील वत्सला अशोक हिंगमिरे या रविवारी (दि. १५) आपल्या कुटुंबासह विवाह सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी रोडने जात होत्या. सुखमणी लॉन्सजवळ हॉटेल व्हेज करी परिसरात पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी हिंगमिरे यांच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि नेकलेस असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज ओरबाडून नेला.
२. जत्रा हॉटेल चौकात सर्व्हिस रोडवर चोरी
दुसरी घटनाही आडगाव पोलीस ठाणे हद्दीत जत्रा हॉटेल चौकात घडली. फिर्यादी सरला साहेबराव शिरोळे या सर्व्हिस रोडने पायी घराकडे जात असताना दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे गंठण हिसकावून नेले. या दोन्ही घटनांचा तपास सहाय्यक निरीक्षक जगदाळे करत आहेत.
३. सिडकोत फुले तोडताना महिला लक्ष्य
तिसरी घटना सोमवारी (दि. १६) सकाळी सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर भागात घडली. प्रभावती मधुकर आफ्रे या आपल्या घरासमोर फुले तोडत असताना हेल्मेट घालून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅमची ४० हजार रुपये किमतीची पोत लंपास केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर तपास करत आहेत.
४. जेलरोड परिसरात फेरफटका मारताना चोरी
चौथी घटना नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथे घडली. मनिषा विजय शिंदे या रविवारी रात्री जेवण करून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. रात्रीच्या सुमारास त्या घराचे गेट उघडत असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची १.५० लाख रुपये किमतीची शॉर्ट पोत हिसकावून नेली. सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
५. भगूरमध्येही चैनस्नॅचिंगचा थरार
पाचवी घटना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत भगूर येथे घडली. संगिता राजेंद्र ओहोळ या आपल्या मुलीसह माधव पार्क सोसायटी परिसरातून पायी जात असताना, पल्सरवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे १ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडले. हवालदार गुंजाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नागरिकांना आवाहन:
शहरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा निर्जन स्थळी वावरताना सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.