नाशिक, (प्रतिनिधी) १६ मार्च - शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात शेअर ट्रेडिंगचे बनावट कार्यालय थाटून तिघा गुंतवणूकदारांची सुमारे २७ लाख २ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या दोन भावांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांचा आधार
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जांभुळकर व सिद्धार्थ जांभुळकर (रा. फाशीचा डोंगर, ध्रुवनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विपुल प्रभाकर चव्हाण (रा. शिवशक्ती चौक, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित जांभुळकर बंधूंनी कॅनडा कॉर्नर भागात शेअर ट्रेडर्सचे कार्यालय सुरू केले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे 'सेबी'ची (SEBI) अधिकृत परवानगी असल्याचे भासविले.
अशी झाली फसवणूक
फिर्यादी चव्हाण यांच्यासह वैभव भणगे, पद्माकर बागडे व शफिक शेख या गुंतवणूकदारांनी २०२२ मध्ये संशयितांची भेट घेतली होती. यावेळी संशयितांनी त्यांना 'निरमल बंग प्रा.लि.' या नामांकित कंपनीत फॉरेक्स ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखवले. विश्वासार्हता पटवून देण्यासाठी संशयितांनी सदर कंपनीचे बनावट लेटरहेड आणि स्टेटमेंट दाखवले. या आमिषाला बळी पडून चव्हाण यांनी १७ लाख रुपये, तर उर्वरित गुंतवणूकदारांनी मिळून एकूण २७ लाख २ हजार रुपये गुंतवले.
गुंतवणूकदारांची पोलिसांत धाव
दीर्घ काळ उलटूनही मुद्दल आणि परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. वारंवार पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलीस आयुक्तालयाचा रस्ता धरला. या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसांनी जांभुळकर बंधूंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.
नाशिक : रस्त्याने पायी जाणाºया महिलेच्या गळ््यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील गणेशनगर भागात घडली. या घटनेत सुमारे ३५ हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता अमोल थोरे (रा.मोहिनी व्हीव सोसा. गणेश नगर,सातपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. थोरे रविवारी (दि.१५) रात्री आपल्या इमारतीकडून गणेशनगरच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. लाईफ केअर मेडिकल परिसरात दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी थोरे यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करीत आहेत.