बारामती, (प्रतिनिधी) १६ मार्च - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही बारामतीची जागा लढवणार नाही, सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही," असे सांगत सुळे यांनी बारामतीत कौटुंबिक सौहार्द जपण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बारामतीची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता बळावली आहे.
राजकीय चर्चेला पूर्णविराम
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. नुकतीच निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या जागेवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) कोणाला उमेदवारी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. मात्र, सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सुनेत्रा वहिनींबद्दल आदर
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी याआधीही स्पष्ट केले आहे की, आम्ही ही जागा लढवणार नाही. सुनेत्रा वहिनी आमच्या कुटुंबातील आहेत, त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा विषयच येत नाही." सुळे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बारामती पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. ३० मार्चपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर आता ही निवडणूक केवळ औपचारिकता उरते की काय, अशी चर्चा बारामतीकरांमध्ये सुरू झाली आहे.