धक्कादायक... हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याचा नंगा नाच... तरुणावर सपासप वार...

Share:
Last updated: 16-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ मार्च - लग्नाकार्यातील हळदीच्या कार्यक्रमात नाचताना झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना बीडी कामगार नगर, अमृतधाम भागात घडली आहे. नाचताना धक्का लागल्याचा जाब विचारल्याने एका टोळक्याने एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल सोमनाथ जगळे (रा. बीडी कामगार नगर) हा तरुण शनिवारी (दि. १४) रात्री आपल्या मामेभावाच्या (तन्मय शिरसाठ) हळदीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. सर्व पाहुणे मंडळी उत्साहात नाचत असताना संशयित सिद्धांत उर्फ भुऱ्या वंजारी याचा अमोलला धक्का लागला. अमोलने त्याला 'व्यवस्थित नाच' असा सल्ला दिला, मात्र हा सल्ला संशयिताच्या जिव्हारी लागला.

Advertisement

टोळक्याकडून बेदम मारहाण आणि शस्त्राने वार
धक्का लागल्याच्या रागातून भुऱ्या वंजारी याने आपले साथीदार पियुष खाडे, चिराग गजबे आणि नितीन मरकड (सर्व रा. बीडी कामगार नगर) यांना बोलावून घेतले. या टोळक्याने अमोलला गर्दीतून बाजूला नेले आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे स्वरूप इतके वाढले की, संशयित भुऱ्या वंजारी याने कमरेला खोचलेला धारदार कोयता काढून अमोलच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात अमोलच्या हातावर गंभीर वार झाला असून तो जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी अमोल जगळे याने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिसांनी चारही संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुवर करत आहेत.

नाशिक : गर्दीची संधी साधत चोरट्यांनी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हातोहात लांबविले. ही घटना निमाणी बसस्थानकात घडली असून यात ७० हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुचिता विष्णू बर्डे (रा.येवला जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. बर्डे रविवारी (दि.१५) शहरात आल्या होत्या सायंकाळच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी निमाणी बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगर बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हातोहात लांबविले. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.