पुणे, (विशेष प्रतिनिधी) १४ मार्च - केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नुकतीच एक महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, डॉक्टरांनी त्यांना पुढील एक महिना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. साधारण २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेल्या एका जुन्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती खुद्द मोहोळ यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
जुनी दुखापत आणि शस्त्रक्रिया
मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, २९ वर्षांपूर्वी कोल्हापुरात कुस्ती खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्यांचा कुस्तीचा प्रवास तेव्हाच थांबला होता. इतकी वर्षे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र गेल्या काही काळापासून हा त्रास प्रचंड वाढला होता. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरला नव्हता. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.
कामाच्या ओढीमुळे मन अस्वस्थ
शस्त्रक्रियेनंतर मिळालेल्या विश्रांतीच्या सल्ल्यामुळे मोहोळ यांनी काहीसे शल्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "एकीकडे संसदेचे अधिवेशन, देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील कामांचा धडाका आणि त्यातच यंदाची 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा... या सगळ्या जबाबदाऱ्या समोर असताना विश्रांती घ्यावी लागत आहे. दुखापतीच्या त्रासापेक्षा या कामांपासून दूर राहावे लागत असल्याचा त्रास अधिक होतोय."
महिन्याभरात पुन्हा सेवेत सक्रिय
शारीरिक व्याधीमुळे सध्या जरी त्यांना कामापासून दूर राहावे लागत असले, तरी नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावर आपण लवकरच बरे होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. "महिन्याभरातच पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त जोमाने तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन," असा शब्दही त्यांनी पुणेकर आणि देशवासीयांना दिला आहे.