अश्विनी भाटवडेकर, सांगली, १४ मार्च - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य असेल तर ग्रामीण भागातील तरुणही देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतात, हे खानापूर तालुक्यातील बलवडी (भा) येथील संकेत सदाशिव कुंभार याने सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत संकेतने देशात ५३९ वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. बलवडी गावातून यूपीएससी उत्तीर्ण होणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरल्याने संपूर्ण तालुक्यात अभिमानाची लाट उसळली आहे.
शिक्षक पित्याचा वारसा आणि दिल्लीत खडतर तपश्चर्या
संकेतचे वडील सदाशिव कुंभार हे रायगड जिल्ह्यातील रोहा येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर आई जयश्री या गृहिणी आहेत. संकेतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रोहा येथेच पूर्ण झाले. त्यानंतर त्याने लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर प्रशासकीय सेवेचे ध्येय उराशी बाळगून त्याने दिल्ली गाठली आणि तिसऱ्या प्रयत्नात हे यश खेचून आणले.
केवळ अभ्यासच नव्हे, तर संशोधनातही अव्वल
संकेत हा केवळ पुस्तकी कीडा नसून त्याला संशोधनाची मोठी आवड आहे. 'ऑनलाइन अन्वेषण' या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने 'बेसिक सायन्स' विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. तसेच चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने द्वितीय क्रमांक मिळवला होता. आपल्या या तांत्रिक ज्ञानाचा आणि संशोधक वृत्तीचा वापर करून प्रशासनात वेगळी छाप पाडण्याचा त्याचा मानस आहे.
डूडल क्राफ्टिंग आणि स्केचिंगचा छंद
कठोर अभ्यासाच्या प्रवासात संकेतने आपल्या कला जोपासल्या. डूडल क्राफ्टिंग आणि पोर्ट्रेट स्केचिंग या त्याच्या आवडीच्या कला आहेत. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या छंदाचा त्याला मोठा फायदा झाला. आता 'आयपीएस' (IPS) होऊन पोलीस दलात सेवा बजावण्याचे स्वप्न त्याने पाहिले आहे.
"माझ्या यशात आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. इंजिनिअरिंगमधील तांत्रिक ज्ञान आणि संशोधक दृष्टीकोन मला प्रशासकीय कामात नक्कीच मदत करेल. गावाला मिळालेला हा पहिला मान सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन."
— संकेत कुंभार (यूपीएससी यशस्वी उमेदवार)