खेळाडूंनो लक्ष द्या! ई-प्रमाण' प्रणाली कार्यान्वित... असा करा अर्ज...

Share:
Main Image
Last updated: 13-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ मार्च - राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये मिळणाऱ्या ५ टक्के आरक्षणाचा लाभ आता अधिक पारदर्शक आणि गतीने मिळणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही अद्ययावत डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली असून, आगामी सर्व पदभरतीसाठी या प्रणालीद्वारे मिळवलेले प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली.

ब्लॉकचेन आणि AI तंत्रज्ञानाचा वापर
ही प्रणाली पूर्णपणे 'ब्लॉकचेन' आणि 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नसल्याने बनावट प्रमाणपत्रांच्या प्रकारांना पूर्णपणे आळा बसणार आहे. या प्रणालीमुळे कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत डिजिटल अहवाल उपलब्ध होतो. प्रत्येक प्रमाणपत्रावर स्वतंत्र 'QR' कोड असल्याने एमपीएससी (MPSC) किंवा पोलीस भरती विभागाला त्याची सत्यता त्वरित पडताळता येणार आहे.

Advertisement

जुन्या उमेदवारांनाही नोंदणी आवश्यक
ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक स्तरावर प्रमाणपत्र पडताळणी केली आहे, त्यांनाही आता शासकीय भरतीसाठी अर्ज करताना 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणालीवरून डिजिटल प्रमाणपत्र काढून घेणे अनिवार्य आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातील अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अशी करा नोंदणी:
संकेतस्थळ: sports.maharashtra.gov.in वर भेट द्या.
टॅब: 'Our Services' मधील '5% Reservation' या पर्यायावर जा.
आवश्यक कागदपत्रे: आधारसंलग्न मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डची PDF आणि क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्राची PDF प्रत.
तक्रार निवारण: जर स्पर्धेचा अभिलेख (रेकॉर्ड) उपलब्ध नसेल, तर 'Grievance' पर्यायाचा वापर करून मूळ प्रमाणपत्राची स्कॅन प्रत जोडावी.

या खेळांचे अभिलेख उपलब्ध
सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), जूडो (२०२४) आणि कुराश (२०१७-१८, २०२४-२५) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. इतर खेळांची माहिती देखील टप्प्याटप्प्याने पोर्टलवर अपडेट केली जात आहे. तांत्रिक अडचणींसाठी खेळाडूंनी support@kridaepramaan.org यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.