- डॉ. अरुण पवार, वैद्यकीय अधीक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक
दरवर्षी १२ मार्च हा दिवस ‘जागतिक किडनी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य “Kidney Health for All - Caring for People, Protecting Planet” असा असून किडनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
जागतिक स्तरावर प्रत्येक दहा व्यक्तींमागे एक व्यक्ती किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून येते. किडनीच्या आजाराची सुरुवातीची अवस्था क्रॉनिक किडनी डिसीज (CKD – Initial) आणि पुढील गंभीर अवस्था CKD (Advanced) अशी असते. सुरुवातीच्या अवस्थेत औषधोपचारांनी आजार नियंत्रणात राहू शकतो, मात्र प्रगत अवस्थेत नियमित डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) आवश्यक ठरते.
भारतात सुमारे १४ टक्के लोकसंख्या CKD आजाराने प्रभावित असल्याचे दिसून येते. वयानुसार या आजाराचे प्रमाण वाढत जाते. २० ते ४० वर्षे वयोगटात सुमारे २० ते २५ टक्के, ४० ते ६० वर्षे वयोगटात ३० ते ३५ टक्के तर ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये सुमारे ४० टक्क्यांपर्यंत किडनी आजाराचे प्रमाण आढळते.
किडनीच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, व्यसनाधीनता (सिगारेट, तंबाखू, मद्यपान), आहारातील जास्त मीठ, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यांचा समावेश होतो. विशेषतः भारतामध्ये रक्तदाब आणि मधुमेह या दोन आजारांमुळे किडनी आजाराचे प्रमाण वाढताना दिसते. दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे आढळते. त्यामुळे २५ वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम (NCD) अंतर्गत रक्तदाब, मधुमेह आणि किडनी आजारांची तपासणी व उपचार सुविधा शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित व पौष्टिक आहार, आहारातील मिठाचे मर्यादित सेवन, व्यसनांपासून दूर राहणे आणि दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. साधारणपणे दररोज सुमारे २ ते २.५ लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी हितावह ठरते.
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत किडनी आजाराच्या रुग्णांसाठी डायलिसिससह विविध उपचार सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक येथे किडनी आजारांसाठी डायलिसिस, मूत्रपिंडातील अडथळे, किडनी कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर तसेच लिथोट्रिप्सी यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या रुग्णालयात दरवर्षी सुमारे २ हजार ८०० रुग्णांवर किडनी
आजाराचे उपचार केले जातात. तसेच डायलिसिस विभागात तीन शिफ्टमध्ये सेवा दिली जाते आणि दरमहा सरासरी ४०० रुग्णांवर डायलिसिस प्रक्रिया केली जाते. किडनीचे आजार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यसनमुक्त जीवनशैली आणि नियमित व्यायाम या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शासनाच्या विविध आरोग्य योजनांमुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.