गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल...  ग्रामीण व शहरी भागासाठी आता एवढ्या दिवसांचे बंधन...

Share:
Main Image
Last updated: 12-Mar-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) १२ मार्च - पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेचे सावट आता भारतीय स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहे. देशातील एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या निर्णयानुसार, ग्रामीण भागातील ग्राहकांना आता ४५ दिवसांनंतरच दुसरे सिलिंडर बुक करता येईल, तर शहरी भागासाठी ही मर्यादा २५ दिवस निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत या नव्या नियमांची माहिती दिली. यापूर्वी देशभरात दोन बुकिंगमध्ये किमान २१ दिवसांचे अंतर ठेवण्याचा नियम होता, तो काही दिवसांपूर्वीच २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र, आता ग्रामीण आणि शहरी अशी वर्गवारी करून हे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

Advertisement

का घेतला सरकारने हा निर्णय?
गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाईच्या अफवा पसरल्याने ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. यामुळे अनेक ग्राहक गरज नसतानाही आगाऊ बुकिंग (Panic Booking) करू लागले होते. जे ग्राहक साधारणपणे ५० ते ५५ दिवसांनी बुकिंग करत होते, त्यांनी अवघ्या १५ दिवसांतच रिफिल बुक करण्यास सुरुवात केली. यामुळे यंत्रणेवर ताण येऊन साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंगची शक्यता निर्माण झाली होती. हा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी सरकारने हा 'वेटिंग पिरियड' वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे बदल एका नजरेत:
ग्रामीण भाग: एका सिलिंडरनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी आता ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
शहरी भाग: शहरांमध्ये हे अंतर २५ दिवस असेल.
व्यावसायिक वापर: व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यावरही मर्यादा आणल्या गेल्या असून, घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे.
पुरवठा: सरकारने स्पष्ट केले आहे की, देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि गेल्या ५ दिवसांत उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

घाबरून जाऊ नका : सरकारचे आवाहन
संसदेत बोलताना हरदीप सिंह पुरी यांनी जनतेला आश्वस्त केले की, "देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. केवळ पुरवठा साखळीवर पडणारा अतिरिक्त दबाव कमी करण्यासाठी हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून 'पॅनिक बुकिंग' करू नये."

Comments

No comments yet.