मुंबई, (प्रतिनिधी) १२ मार्च - नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यामुळे नापीक होत असलेल्या क्षेत्रासाठी कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी खेडला, रुई, वाकद शिरवाडे, देवगाव व देवगाव-२ या चर योजनेच्या परिक्षण व देखभाल दुरुस्ती कामांचा सन २०२६-२७ च्या आराखड्यात समावेश असल्याची माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी उत्तरात दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर ता. निफाड परिसरात एक्सप्रेस कालव्याचे पाणी तसेच पावसाचे पाणी साचल्यामुळे शेती नापीक होत असल्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विधानपरिषद सदस्य आमदार पंकज भुजबळ विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.
आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नात म्हटले आहे की, नांदूर मधमेश्वर ता. निफाड, जि. नाशिक या एक्सप्रेस कालव्याच्या पाण्यामुळे तसेच पावसाच्या पाण्याच्या साठ्यामुळे नापीक होत असलेल्या शेती क्षेत्रासाठी जलनि:स्सारणाची कामे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत जलसंपदा विभाग तसेच पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. याबाबाग उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय ? तसेच चौकशीच्या अनुषंगाने नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यामुळे व पावसाच्या पाण्यामुळे नापीक होत असलेल्या क्षेत्रासाठी जल:निस्सारणाची कामे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे की, नांदूर मधमेश्वर ता. निफाड, जि. नाशिक या एक्सप्रेस कालव्याच्या पाण्यामुळे तसेच पावसाच्या पाण्याच्या साठ्यामुळे नापीक होत असलेल्या शेती क्षेत्रासाठी जलनि:स्सारणाची कामे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत जलसंपदा विभाग तसेच पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक यांचेमार्फत क्षेत्रिय पाहणी करण्यात आली असून नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यामुळे नापीक होत असलेल्या क्षेत्रासाठी कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी खेडला, रुई, वाकद शिरवाडे, देवगाव व देवगाव-२ या चर योजनेच्या परिक्षण व देखभाल दुरुस्ती कामांना सन २०२६-२७ च्या प्रापणसूचीमध्ये मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे. सन २०२६-२७ च्या प्रापणसूचीमध्ये सदर क्षेत्रातील परिरक्षण व देखभाल दुरुस्तीची कामे निधी उपलब्धतेनुसार हाती घेण्याचे नियोजित असल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर कालव्यास संधानक अस्तरीकरण असल्याने नांदर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यातून पाझर नगण्य आहे. कालव्याच्या उत्तर बाजूने येणारे पावसाचे पाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये निघण्यासाठी जलद कालव्याचे लगत नैसगिक नाल्यांपर्यंत चर, अस्तरीकरण केलेले चर, तसेच काही ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन केलेली आहे. परंतु लगतच्या शेतकऱ्यांकडून अतिक्रमण करुन सदरचे चर बुजवले जात असून वेळोवेळी विभागीय कार्यालयामार्फत सदरचे चर उकरुन पूर्ववत करण्यात येत असल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे.