नाशिकरोड परिसरात दोन भीषण अपघात... दोघांचा मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 12-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ मार्च - दुचाकीवर डबलसीट प्रवास करत असताना रेल्वे पुलाच्या लोखंडी अँगलचा फटका बसल्याने ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदा तुळशीराम शेलार (वय ७३, रा. विमलनगर, जेलरोड) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेलार हे मंगळवारी (दि. ३) सकाळी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून पवारवाडीकडून एकलहरा कॉलनीच्या दिशेने जात होते. रेल्वे पुलाखालून जात असताना पुलाला लावलेल्या लोखंडी अँगलवर शेलार यांचे डोके जोरात आदळले. या धक्क्याने ते दुचाकीवरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. हवालदार शेख याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Advertisement

चेहडीनाक्यावर आयशर ट्रकची दुचाकीला धडक; सिन्नरचा वारकरी ठार

नाशिक-पुणे महामार्गावरील चेहडीनाका परिसरात भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शिवाजी केरू काळे (वय ५७, रा. जोगलटेंभी, ता. सिन्नर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शिवाजी काळे हे बुधवारी (दि. ११) काही कामानिमित्त नाशिक शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने सिन्नरकडे परतत असताना, चेहडीनाका येथील सीएनजी पंपाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने (जीजे ३१ टी ७५८५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात काळे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा पुतण्या वैभव काळे याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हवालदार मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सावध राहा: या घटनांमुळे रस्ते सुरक्षा आणि रेल्वे पुलांची उंची यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर आणि वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

सीसीटीव्हीमुळे गुन्हेगार जेरबंद
नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची वाट अडवित विनयभंग करणाºया संशयितास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना चौक मंडई भागात घडली होती. परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून भामट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश रमेश बर्वे (४८ रा. काळे चौक वडाळानाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास चौक मंडई येथील रिमझीम किराणा दुकानाजवळील बोळीतून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली होती. दुचाकीवर पाठलाग करीत आलेल्या संशयिताने मुलीची वाट अडवित हे कृत्य केले होते. चल मेरे साथ असे म्हणत संशयिताने मुलीचा विनयभंग केला होता. मुलीने आपले घर गाठून कुटूंबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पडताळणी अंती पोलीसांनी संशयितास अटक केली आहे. उपनिरीक्षक योगेश माळी तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.