नाशिकमध्ये आर्किटेक्टची ३५ लाखांच्या बदल्यात कोट्यवधींची फसवणूक... महिला वकिलासह चौघांवर गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 12-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ मार्च - शहरातील एका नामांकित वास्तूविशारदाला (आर्किटेक्ट) खासगी सावकारीच्या पाशात ओढून, कर्जाची पूर्ण परतफेड केलेली असतानाही त्यांची कोट्यवधींची मालमत्ता बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तारण ठेवलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर खरेदीखत केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात महिला वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित बाळासाहेब जाधव, योगेश गंगाधर बोडके, प्रल्हाद पुंडलिकराव कदम आणि नोटरी अ‍ॅड. संजीवणी कमाले अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हर्षल सुकदेव उशीर (रा. गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल उशीर हे व्यवसायाने वास्तूविशारद आहेत. २०२० मध्ये व्यवसायासाठी त्यांना भांडवलाची गरज होती. त्यावेळी त्यांनी संशयितांकडून ३५ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या व्यवहारासाठी सुरक्षितता म्हणून उशीर यांनी मखमलाबाद शिवारातील सर्व्हे नं. ३१५ मधील आपली मोक्याची मिळकत संशयितांकडे तारण ठेवली होती. ८ जानेवारी २०२० रोजी या जागेचा नोटरी साठेखत करारनामा करण्यात आला होता.

Advertisement

फसवणुकीचा असा रचला डाव
फिर्यादी उशीर यांनी घेतलेल्या रकमेची व्याजासह पूर्ण परतफेड केली होती. व्यवहार पूर्ण झाल्यामुळे तारण ठेवलेली मालमत्ता मुक्त होणे अपेक्षित होते. मात्र, संशयितांच्या मनात फसवणुकीचा डाव शिजत होता. त्यांनी आपसात संगनमत करून, फिर्यादीला कोणतीही पूर्वकल्पना न देता दुय्यम निबंधक कार्यालयात (वर्ग ५) बनावट कागदपत्रे सादर केली. याआधारे संशयितांनी त्या मिळकतीचे चक्क स्वतःच्या नावावर खरेदीखत नोंदवून घेतल्याचा आरोप आहे.

पोलीस कारवाई:
या गंभीर फसवणुकीची दखल घेत भद्रकाली पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात कायदेशीर सल्लागार असलेल्या महिला वकिलाचाही समावेश असल्याने खळबळ माजली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नाशिक : धावत्या चारचाकीतील मोबाईल भामट्याने पळविण्याचा प्रयत्न केला. वाहन थांबवून पाठलाग करीत चोरट्यास पकडले असता त्याने मोबाईल फोडून नुकसान केल्याची घटना छत्रपती शिवाजी चौकात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास रंगनाथ शिंदे (रा.ओझर खुर्द ता.संगनमनेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे गेल्या सोमवारी (दि.२) शहरात आले होते. रात्रीच्या वेळी भाऊदास रहाणे यांच्या बोलेरो वाहनातून ते परतीचा प्रवास करीत असतांनी ही घटना घडली. नाशिकरोड परिसरातून ते उड्डाणपुलाखालून जात असतांना छत्रपती शिवाजी चौकात रस्त्या खराब असल्याने बोलेरो गर्दीतून वाट काढत  धिम्या गतीने पुढे जात असतांना अनोळखी तरूणाने चारचाकीतील डॅशबोर्डवर ठेवलेला मोबाईल काढून धुम ठोकली. ही बाब लक्षात येताच शिंदे यांनी वाहनातून उतरत संशयिताचा पाठलाग केला. काही अंतरावर पकडून संशयिताच्या ताब्यातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने मोबाईल रस्त्यावर आपटून फोडून टाकला. शिंदे मोबाईल उचलण्याच्या नादात असतांना संशयिताने झटापट करीत धुम ठोकली असून हवालदार शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.