मुंबई, (प्रतिनिधी) ११ मार्च - पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इराणसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यामध्ये ३०० अब्ज डॉलर्स (सुमारे २५ लाख कोटी रुपये) खर्चून एक नवीन ऑइल रिफायनरी उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी ट्रम्प यांनी भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चे (RIL) जाहीर आभार मानले आहेत.
गेल्या ५० वर्षांतील सर्वात मोठा प्रकल्प
गेल्या पाच दशकांपासून अमेरिकेत एकही मोठी नवीन रिफायनरी उभारण्यात आली नव्हती. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, "अमेरिका खऱ्या अर्थाने ऊर्जा वर्चस्वाकडे (Energy Dominance) परतत आहे. ५० वर्षांनंतर टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे पहिली नवीन अमेरिकन रिफायनरी सुरू होत आहे. हा ३०० अब्ज डॉलर्सचा करार अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे."
रिलायन्सचे आभार का?
या प्रकल्पात रिलायन्स इंडस्ट्रीज महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये रिलायन्सचा उल्लेख करत म्हटले, "या प्रचंड गुंतवणुकीसाठी भारतातील आमचे भागीदार आणि त्यांची सर्वात मोठी खाजगी ऊर्जा कंपनी रिलायन्सचे मी आभार मानतो." मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स या प्रकल्पात गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे अमेरिकन इंधन बाजारपेठेला मोठी ताकद मिळणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
ठिकाण: ब्राउन्सविले बंदर, दक्षिण टेक्सास.
गुंतवणूक: ३०० अब्ज डॉलर्स (सुमारे २५ लाख कोटी रुपये).
रोजगार: हजारो नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार.
पर्यावरण: ही जगातील सर्वात 'स्वच्छ' (Cleanest) रिफायनरी असल्याचा ट्रम्प यांचा दावा.
कच्चा माल: ही रिफायनरी पूर्णपणे अमेरिकन 'शेल ऑइल'वर (Shale Oil) आधारित असेल.
युद्धाच्या छायेतील रणनीती
सध्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती असताना, अमेरिकेने स्वतःची रिफायनिंग क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेची ऊर्जा सुरक्षा तर मजबूत होईलच, पण रिलायन्ससारख्या भारतीय कंपनीचे जागतिक वर्चस्वही अधोरेखित झाले आहे.