नाशिक, (प्रतिनिधी) ११ मार्च - शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पंचवटीतील आयुर्वेदिक कॉलेज परिसरात एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला, तर इंदिरानगर भागात एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दुसरी धक्कादायक घटना इंदिरानगरमधील सल्ली पॉईंट परिसरात घडली. येथे एका तबेल्यात कामाला असलेल्या मजुराच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजाऱ्याने बलात्कार केला. संशयित सुमीत यादव (मूळ रा. बिहार) हा पीडितेच्या कुटुंबाचा शेजारी आहे. मंगळवारी (दि. १०) रात्री ही मुलगी बाथरूमला गेली असता, दबा धरून बसलेल्या यादवने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. बराच वेळ मुलगी घरात न परतल्याने पालकांनी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. पालकांना पाहताच संशयिताने तिथून पळ काढला. सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
मित्रांसोबत जाणाऱ्या तरुणीची अडवली वाट
पहिली घटना पंचवटीतील आयुर्वेदिक कॉलेज भागात घडली. रविवारी (दि. ८) दुपारी पीडित तरुणी तिचे दोन मित्र प्रतीक आणि हर्षवर्धन यांच्यासह पायी जात असताना सतीश वाघमारे, ओम भांगरे, रमेश पिठे व तुषार साळवे या चौघांच्या टोळक्याने त्यांची वाट अडविली. संशयितांनी तरुणीच्या मित्रांना धक्काबुक्की केली. यावेळी सतीश वाघमारे याने "यांना सोडू नका," असे म्हणत तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. उपनिरीक्षक पंकज सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शहरात एकाच वेळी घडलेल्या या दोन गंभीर घटनांमुळे संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.