नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 11-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ११ मार्च - नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, भूमी अभिलेख उपसंचालक, निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

Advertisement

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य प्रतीक आहे. देशभरातून तसेच जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. यावेळी नाशिक चक्राकार रस्ता, त्र्यंबक डीपी रोड, त्र्यंबक दर्शन पथ, द्वारका सर्कल परिसराचा विकास, ओझर विमानतळाशी संबंधित सुविधा, घोटीवाले रोड, कर्मचारी वसाहत, घाट बांधकाम तसेच विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन, जमीन मोजणी आदी कामांचा सविस्तर आढावा मंत्री महाजन यांनी घेतला.

कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा विचार करून सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. कामे वेळेत पूर्ण होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती दर्जेदार आणि टिकाऊ असणेही महत्त्वाचे आहे.

कुंभमेळ्याच्या भव्यदिव्य आयोजनासाठी सर्व विभागानी आपआपसात समन्वय ठेवून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

Comments

No comments yet.