दोन दुचाकींची समोरासमोर धडक... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी...

Share:
Main Image
Last updated: 11-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ मार्च - आडगाव-म्हसरूळ मार्गावरील सुरती फरसान दुकान परिसरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या शनिवारी (दि. ७) झालेल्या या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सोमवारी (दि. ९) उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

अपघाताचा थरार
मयत दुचाकीस्वाराचे नाव गोपीनाथ रामदास टोंगारे (३३, रा. वरवंडी रोड, म्हसरूळ) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपीनाथ टोंगारे हे शनिवारी दुपारी आडगाव शिवारात काही कामानिमित्त गेले होते. तिथून आपल्या दुचाकीवर परतीचा प्रवास करत असताना, सुरती फरसान दुकान परिसरात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरात धडक दिली. या अपघातात टोंगारे यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती.

Advertisement

उपचारादरम्यान मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच त्यांचे मेहुणे अर्जुन खराटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टोंगारे यांना तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय सूत्रांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार खराटे करत आहेत.

नाशिक : भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाखाच्या रोकडवर डल्ला मारला. ही घटना देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर शंकरराव गायकवाड (रा. सैनिक सोसा.मागे गायकवाडमळा विजयनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड यांचे मेव्हणे विजय शांताराम झनकर (रा.आर्क पुष्प सोसायटी) यांच्या घरी ही घरफोडी झाली झनकर कुटूंबियांनी यांनी भूखंड विक्री करून ६ लाख ८० हजार रूपयांची रक्कम आपल्या राहत्या घरातील कपाटात ठेवली होती. रविवारी (दि.८) झनकर कुटूंबियास अचानक बाहेरगावी जावे लागल्याने ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा मागील खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील रोकड हातोहात लांबविली. हवालदार बोरसे तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.