स्वप्नांच्या आड गरिबी येत नाही... नक्षलग्रस्त भागातील हेमकृष्णची UPSC ला गवसणी... बघा, भन्नाट यशोगाथा...

Share:
Main Image
Last updated: 11-Mar-2026

अश्विनी भाटवडेकर

मुंबई, ११ मार्च - गोंदियासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणारा एक आदिवासी युवक सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला कारण आहे, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मिळवलेलं यश. होय, नुकत्याच लागलेल्या लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील हेमकृष्ण पिसदे यांनी उत्तम कामगिरी केली आहे. 

लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा नुकताच निकाल लागला. देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी त्यात बाजी मारली आहे. यातीलच एक चर्चेत असणारे नाव म्हणजे हेमकृष्ण पिसदे! जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर तुमची परिस्थिती काहीही असू द्या, यश तुमचंच असतं, हे पिसदे यांनी सिद्ध केलं. 

Advertisement

आदिवासी भागातील हा तरुण. हेमकृष्ण पिसदे यांनी आपले पदवी शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून (BA) पूर्ण केले. त्यानंतर चारवेळा MPSC च्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि शेवटी नायब तहसीलदार असूनही देशसेवेच्या वेडापायी UPSC देण्याचं ठरवलं. मात्र, घरची बेताची परिस्थिती असल्याने वडिलांनी हेमकृष्णला नोकरी करण्यास सांगितले. आई-वडील शेतकरी पण हेमकृष्णचे स्वप्न काही तरी मोठे करण्याचे होते. बाबांचे ऐकत त्याने मुंबईत कामगार अधिकारी म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्यांनतर त्याने तहसीलदारपदी नियुक्ती मिळवली. पण काही तरी करण्याचे स्वप्न त्याला शांत बसू देत नव्हते, अखेर त्याने UPSC ची तयारी सुरू केली.

अमरावतीमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्याने UPSC च्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि कठीण परिश्रम घेत यंदाच्या निकालात AIR 839 रँक मिळवली. या यशानंतर त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. “दुर्गम भागात राहात असूनही मोठ्या जिद्दीने अभ्यास केला तर यश नक्की मिळते, हा माझा विश्वास आज सार्थ ठरला. माझ्या यशाचे खरे श्रेय माझ्या पालकांना आणि शिक्षकांना जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले, तर निश्चितच यश मिळते.”

त्यांच्या या यशामुळे गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण आदिवासी समाजात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचा संघर्षमय प्रवास अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. 

Comments

No comments yet.