"व्हॉट्सॲपवर आरटीओची पेमेंट लिंक आलीय? क्लिक करण्यापूर्वी 'हे' वाचा!"

Share:
Main Image
Last updated: 10-Mar-2026

जळगाव, (प्रतिनिधी) १० मार्च - ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चलन भरण्याच्या बहाण्याने नागरिकांना बनावट लिंक पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने वाहनधारकांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक सूचना जारी केली असून, केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले आहे.
अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगार परिवहन विभागाच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या बनावट वेबसाईट्स तयार करून लोकांची वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती चोरत आहेत. यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी 'डोमेन नेम' कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

केवळ 'या' अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा:
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, सर्व अधिकृत शासकीय संकेतस्थळे ही नेहमी .gov.in या डोमेनने समाप्त होतात.
वाहन नोंदणीसाठी (VAHAN): https://vahan.parivahan.gov.in
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (SARATHI): https://sarathi.parivahan.gov.in
परिवहन सेवा माहितीसाठी: https://www.parivahan.gov.in
ई-चलन भरण्यासाठी: [संशयास्पद लिंक काढली]

Advertisement

या गोष्टी टाळा:
आरटीओ किंवा परिवहन विभागाकडून कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही. त्यामुळे .com, .online, .site किंवा .in अशा डोमेन असलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. तसेच अनोळखी व्यक्तींनी पाठवलेले कोणतेही APK फाईल्स (अ‍ॅप्स) डाऊनलोड करू नका.

फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुमची किंवा ओळखीच्या कोणाची फसवणूक झाली असेल, तर तात्काळ खालील मार्गांनी तक्रार नोंदवा:
१. पोर्टल: www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार करा.
२. हेल्पलाईन: १९३० या क्रमांकावर संपर्क साधा.
३. पोलीस: जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

वाहनधारकांनी घाईगडबडीत कोणत्याही लिंकवर पैसे भरू नयेत आणि सायबर सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.