'ब्लॅक बॉक्स'चा तपशील गुलदस्त्यात असताना वैमानिक दोषी कसा?

Share:
Main Image
Last updated: 10-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० मार्च - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आणि संबंधित विमान कंपनीच्या भूमिकेवर आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे. "ब्लॅक बॉक्समधील माहिती अद्याप समोर आलेली नसताना, विमान कंपनीच्या मालकाने काही वेळातच वैमानिकाची चूक असल्याचे कसे जाहीर केले?" असा जळजळीत सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला असून, या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे.

तपास यंत्रणांच्या 'सोयीस्कर' बातम्या?
रोहित पवार यांनी 'सीआयडी' (CID) आणि 'एएआयबी' (AAIB) च्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "तपास यंत्रणांकडून कधी ब्लॅक बॉक्स जळाला, तर कधी डेटा रिकव्हर झाल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र यंत्रणेने मिठाची गुळणी धरली असून कोणतीही ठोस माहिती समोर येत नाहीये. अशा परिस्थितीत अफवांचे पीक येणे स्वाभाविक आहे."

Advertisement

व्ही. के. सिंग यांच्यावर निशाणा
विमान चालक कंपनी 'VSR' चे मालक व्ही. के. सिंग यांच्या भूमिकेवर पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर अवघ्या काही वेळातच सिंग यांनी "ही वैमानिकाची चूक आहे" असे विधान केले होते. यावर आक्षेप घेत रोहित पवार म्हणाले:
"ब्लॅक बॉक्समध्ये काय रेकॉर्ड झाले हे अद्याप स्पष्ट नाही, मग व्ही. के. सिंग यांना वैमानिकाची चूक असल्याचे कसे कळले? स्वतःचे हात वर करून दुसऱ्याला (वैमानिकाला) तोफेच्या तोंडी देण्याचा आणि स्वतः नामनिराळे राहण्याचा हा कंपनी मालकाचा डाव दिसतोय."

यंत्रणेने वास्तव समोर आणावे
जोपर्यंत अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती बाहेर येत नाही, तोपर्यंत जनतेने कोणत्याही आधारहीन चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विमान अपघातासारख्या गंभीर विषयात तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पारदर्शक तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

महत्वाचे मुद्दे:
तपासातील विसंगती: ब्लॅक बॉक्सच्या स्थितीबाबत यंत्रणांकडून येणारी परस्परविरोधी माहिती.
कंपनीची घाई: अपघाताच्या कारणांचा शोध लागण्यापूर्वीच मालकाने दिलेले 'क्लीन चिट' विधान.
सुरक्षेचा प्रश्न: व्हीव्हीआयपी (VVIP) प्रवासादरम्यान विमान कंपन्यांची जबाबदारी आणि तांत्रिक देखभालीकडे झालेले दुर्लक्ष.

Advertisement

Comments

No comments yet.