नाशिकच्या सराफाला १३ लाखांचा चुना... ४ किलो चांदीचा व्यवहार...

Share:
Main Image
Last updated: 09-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ मार्च - चांदी खरेदी-विक्रीच्या व्यवसायात विश्वासार्हतेचा फायदा घेत पुण्याच्या व्यावसायिकांनी नाशिकमधील एका नामांकित सराफाला तब्बल १३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कच्च्या चांदीची ऑर्डर देऊन आणि पूर्ण पैसे अदा करूनही माल न पाठवता फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
रविवार पेठेतील देवधर लेन येथे राहणारे प्रकाश बच्चूभाई तांबट हे चांदीचे व्यापारी आहेत. त्यांनी २३ जानेवारी रोजी त्यांच्या 'बी.बी. कॉर्पोरेशन' या दुकानासाठी ४ किलो कच्च्या चांदीची मागणी पुण्यातील 'नवकार ज्वेलर्स'कडे केली होती. पुण्याच्या या व्यापाऱ्यांनी चांदी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याने, तांबट यांनी विश्वासाने १३ लाख ४ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात अदा केले.

दीड महिना उलटला तरी टाळाटाळ
पैसे मिळाल्यानंतर तातडीने माल पाठवणे अपेक्षित होते, मात्र दीड महिना उलटूनही पुण्याच्या व्यापाऱ्यांनी चांदीचा पुरवठा केला नाही. तांबट यांनी वारंवार संपर्क साधला असता, संशयितांकडून केवळ आश्वासने आणि टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश तांबट यांनी पोलिसांत धाव घेतली.

Advertisement

पुण्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी प्रकाश तांबट यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी पुण्यातील गोविंद हलवाई चौक परिसरातील रहिवासी असलेल्या तीन संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे:
नेमीचंद कोरीमुथ्था
प्रणव कोरीमुथ्था
अमन कोरीमुथ्था

पोलीस तपास सुरू: या मोठ्या आर्थिक फसवणुकीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे करत आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या सराफा बाजारपेठेत परगावातील व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


नाशिक : शालिमार भागात व्यवसाय करणाºया व्यावसायिकाच्या सव्वा दोन लाखाच्या रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला. गर्दीची संधी साधत भामट्यांनी बांगड्या विक्रीच्या हातगाडीला अडकवलेली पिशवी चोरून नेली असून या पिशवीत रक्कम होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पांडूरंग शिंदे (रा.सावतानगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे व्यावसायीक असून ते शालिमार भागात उघड्यावर व्यवसाय करतात. शनिवारी (दि.७) दुपारच्या सुमारास ते दीपसागर शुज दुकानाजवळ आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. बांगडी विक्रीच्या हातगाडीला रोकड असलेली पिशवी टांगून ते व्यवसाय सांभाळत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी त्यांची पिशवी हातोहात लांबविली. या पिशवीत दोन लाख २३ हजार रूपयांची रोकड होती. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.

Comments

No comments yet.