मुंबई, (प्रतिनिधी) ९ मार्च - आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. राजश्रीला 'इन्फिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा' (Infiltrating Ductal Carcinoma) म्हणजेच पहिल्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. मात्र, या आजाराने खचून न जाता, राजश्रीने आता या संकटाचा उपयोग समाजजागृतीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नियमित तपासणीमुळे वेळेत निदान
एका मुलाखतीदरम्यान राजश्रीने सांगितले की, ती नेहमीप्रमाणे नियमित आरोग्य तपासणीसाठी गेली असता डॉक्टरांना एक गाठ आढळली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला येऊन तिने पुढील चाचण्या केल्या. सोनोग्राफी आणि बायोप्सीनंतर तिला या आजाराबद्दल समजले. नियमित तपासणीमुळेच हा आजार पहिल्या टप्प्यात लक्षात आला, जो उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
?igsh=MTMydDRrM3I4ampzZQ==
जागरूकतेचा अभाव आणि राजश्रीचा पुढाकार
"मी माझ्या अनेक मैत्रिणींना फोन केला, पण कोणाचेही नियमित चेकअप झाले नव्हते. ३५ वर्षांनंतर प्रत्येक महिलेसाठी ही चाचणी आवश्यक आहे," असे राजश्रीने नमूद केले. ग्रामीण भागातील महिलांकडे आरोग्यासाठी पुरेसा वेळ आणि सुविधा नसल्याबद्दल तिने चिंता व्यक्त केली. केवळ स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता, इतरांनाही या धोक्यापासून वाचवण्यासाठी तिने आता कंबर कसली आहे.
महिला दिनानिमित्त अनोखा संकल्प
राजश्रीने महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रियांना एक मोलाचा संदेश दिला आहे. "या महिला दिनाला घरातील स्त्रियांना दागिने किंवा कपडे देण्याऐवजी सोनोग्राफी, पॅप स्मीअर टेस्ट आणि मॅमोग्राम टेस्ट गिफ्ट म्हणून द्या," असे आवाहन तिने केले आहे. इतकेच नाही तर, तिने आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांना आणि सहायकांना (Assistants) देखील हेच आरोग्यदायी गिफ्ट देण्याचे जाहीर केले आहे.
येत्या काही आठवड्यांत राजश्री स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करणार आहे. "एक कलाकार म्हणून मी माझ्या दुःखाचा वापर कलेसाठी करते, आता या त्रासाचा वापर मी लोकांना जागृत करण्यासाठी करेन," अशा शब्दांत तिने आपला निर्धार व्यक्त केला.
तिच्या या धाडसी निर्णयाचे आणि समाजसेवेच्या वृत्तीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.