नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ८ मार्च - जागतिक पातळीवर वाढलेला तणाव आणि इंधनाचे विस्कळीत होणारे नियोजन लक्षात घेता, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर (LPG) बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना एका सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान २१ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी हे अंतर १५ दिवसांचे होते.
नेमका बदल काय?
आतापर्यंत ग्राहकांना सिलिंडर मिळाल्यानंतर १५ दिवसांनी नवीन बुकिंग करण्याची मुभा होती. मात्र, पुरवठा साखळीवर पडणारा ताण आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने हा कालावधी वाढवून २१ दिवस केला आहे. याचा अर्थ असा की, सिलिंडरची डिलिव्हरी झाल्यापासून २१ दिवस पूर्ण झाल्याशिवाय तुमचे नवीन बुकिंग स्वीकारले जाणार नाही.
सॉफ्टवेअरमध्ये तातडीने बदल
हा नवीन नियम अंमलात आणण्यासाठी सर्व गॅस एजन्सींच्या सॉफ्टवेअरमध्ये तातडीने बदल करण्यात आले आहेत. गॅस कंपन्यांनी त्यांच्या प्रणाली (System) अपडेट केल्या असून, जर एखाद्या ग्राहकाने २१ दिवसांच्या आत बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ते 'रिजेक्ट' केले जाणार आहे.
नियमामागील मुख्य कारणे:
जागतिक तणाव: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावर होणारा परिणाम.
नियोजनाची गरज: इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करणे.
साठेबाजीला लगाम: अनावश्यक बुकिंग रोखून गरजू ग्राहकांना वेळेत गॅस मिळावा हा उद्देश.
ज्या ग्राहकांकडे डबल सिलेंडर कनेक्शन आहे, त्यांनी आपले नियोजन अधिक सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कारण आता रिफिलिंगसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.