नाशिक, (प्रतिनिधी) ८ मार्च - महसूल विभागाच्या कामकाजाला अधिक गतिमानता देत नागरिकांना महसूल सेवा स्थानिक स्तरावर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बळकटीकरण योजनेंतर्गत नाशिक येथील शासकीय विश्रामगृहासमोरील धान्य गोदामात मंडळ अधिकारी कार्यालयासह पाच तलाठी कार्यालयांचे कामकाज सुरू करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना विविध महसूल दाखल्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.
या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, विभागीय आयुक्त डाॅ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), हेमांगी पाटील (नाशिक), उपमहापौर विलास शिंदे, अपर तहसीलदार अमोल निकम, माजी आमदार बाळासाहेब सानप, मंडळ अधिकारी अनिल रोकडे तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांना महसूल सेवा अधिक जवळच्या स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, विविध दाखले, नोंदी व इतर शासकीय सेवा सुलभ आणि वेळेत मिळाव्यात, या उद्देशाने मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
सदरचे कार्यालय सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या धान्य गोडाऊन इमारतीचा योग्य उपयोग करून तेथे मंडळ अधिकारी कार्यालयासह पाच तलाठी कार्यालयांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून परिसरातील नागरिकांना महसूल विषयक सेवा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार असून शासकीय कामकाजाची गती वाढण्यासही सहाय्य होणार आहे.
यावेळी नागरिकांना विविध महसूल दाखल्यांचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना पर्यावरणपूरक रंग लावून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला.