त्र्यंबकेश्वर देवस्थानातील घटनेची दंडाधिकारीय चौकशी सुरू... तातडीने येथे करा तक्रार...

Share:
Main Image
Last updated: 08-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ मार्च - त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दिनांक 1 मार्च, 2026 रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दंडाधिकारीय चौकशी सुरू करण्यात आली असून, या संदर्भातील माहिती, तक्रारी तसेच पुरावे ज्या नागरिक व भाविकांकडे असतील त्यांनी पुढील तीन दिवसांच्या आत सादर करावेत, असे आवाहन त्र्यंबकेश्वर–इगतपुरी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. जी. व्ही. एस. पवनदत्ता यांनी केले आहे.

या घटनेबाबत प्राथमिक चौकशीदरम्यान गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत काही बाबी पुढील सखोल तपासासाठी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे या संदर्भातील सर्वंकष माहिती संकलित करण्यासाठी दंडाधिकारीय चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

या चौकशीस पूरक ठरणारी कोणतीही माहिती, तक्रार किंवा संबंधित पुरावे (फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आदी) ज्या नागरिक तसेच भाविकांकडे असतील त्यांनी ती तीन दिवसांच्या आत सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सदरची माहिती ई-मेलद्वारे sdoigatpuri.trimbak@gmail.com या पत्त्यावर पाठविता येईल. तसेच अधिक माहितीसाठी ९४२१५५०८५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही उपविभागीय दंडाधिकारी, त्र्यंबकेश्वर–इगतपुरी उपविभाग  डाॅ. पवनदत्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

No comments yet.