लंडनचे ख्यातनाम हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर राठोरे नाशिकमध्ये...  १० मार्चपासून येथे भेटणार...

Share:
Main Image
Last updated: 07-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ मार्च - उत्तर महाराष्ट्रातील हृदयविकार जडलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटल व हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे येत्या ९ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत 'मोफत हृदयरोग तपासणी व जटिल (कॉम्प्लेक्स) अँजिओप्लास्टी' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लंडन येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर राठोरे या शिबिरात उपस्थित राहून क्लिष्ट शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक व वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे शिबिर दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहील. डॉ. सुधीर राठोरे हे १३ व १४ मार्च रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून रुग्णांच्या जटिल अँजिओप्लास्टी प्रक्रियेत सहभाग घेतील. डॉ. राठोरे हे लंडनच्या एनएचएस (NHS) हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या सात दिवसीय शिबिरात केवळ तपासणीच नव्हे, तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांवरील प्रगत उपचार (Advanced Coronary Intervention) केले जातील. यात मुख्यत्वे:
CTO अँजिओप्लास्टी: पूर्णपणे बंद झालेल्या रक्तवाहिन्या उघडणे.
रोटाब्लेशन (Rotablation): रक्तवाहिन्यांतील कठीण कॅल्शियम काढणे.
IVUS व रोटा OCT: अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे अचूक उपचार.
Primary PCI: हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर तातडीची अँजिओप्लास्टी.

Advertisement

बायपासला पर्याय शोधणाऱ्यांसाठी संधी
ज्या रुग्णांना रक्तवाहिन्यांतील गुंतागुंतीच्या ब्लॉकेजमुळे 'बायपास' शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे, मात्र ज्यांना बायपास करणे धोकादायक वाटत आहे किंवा भीती वाटते, अशा रुग्णांसाठी 'कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी' हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

'आयुष्मान भारत' अंतर्गत मोफत सुविधा
रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांनी सांगितले की, "आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या रुग्णांना या शिबिरात मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार आहे." छातीत दुखणे, दम लागणे, जळजळ होणे किंवा घाम येणे अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी ७७४४९१३९१३ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.

"हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचलेले असते, तिथे सामान्य अँजिओप्लास्टी यशस्वी होत नाही. डॉ. सुधीर राठोरे यांच्यासारख्या जागतिक तज्ज्ञांच्या अनुभवामुळे आता लंडनसारखी आरोग्यसेवा आपल्या भागात उपलब्ध होत आहे."
— डॉ. गौरव वर्मा (संचालक, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट)

Comments

No comments yet.