नाशिक, (प्रतिनिधी) ७ मार्च - नाशिकमधील महिला क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि महिला खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर आपली चमक दाखवता यावी, यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे (NDCA) 'नाशिक महिला प्रीमियर लीग' (NWPL) ची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा रंगणार असून, यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील पॅव्हेलियनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत एनडीसीएचे चेअरमन विनोद शहा यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीच्या सदस्या शर्मिला साळी, सुनील मालुसरे, एनडीसीएचे पदाधिकारी निखिल टिपरी, विक्रांत मते, सीईओ रतन कुयटे आदी मान्यवर उपस्थित होते.
असे असेल स्पर्धेचे स्वरूप:
सहभागी संघ: या स्पर्धेत एकूण ५ फ्रँचायझी संघ असतील.
निवड प्रक्रिया: खेळाडूंची निवड 'ऑक्शन' (लिलाव) पद्धतीने केली जाणार आहे.
सामने: लीग पद्धतीने एकूण १३ सामने खेळवले जातील, त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामना होईल.
कालावधी: एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा.
नाशिकच्या गुणवत्तेला मिळणार वाव
नाशिक जिल्ह्यात सध्या सुमारे १५० महिला क्रिकेटपटू सक्रिय आहेत. ईश्वरी सावकार, तेजस्विनी बाटवाल, शाल्मली क्षत्रिय, रसिका शिंदे यांसारख्या खेळाडूंनी बीसीसीआयच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या अनुभवी खेळाडूंसह नव्या दमाच्या खेळाडूंनाही या लीगमुळे मोठी संधी मिळणार आहे.
पुरुषांच्या धर्तीवर महिलांनाही व्यासपीठ
गेल्या आठ वर्षांपासून एनडीसीएतर्फे पुरुषांची नाशिक प्रीमियर लीग यशस्वीपणे राबवली जात आहे. यातूनच रामकृष्ण घोष आणि साहिल पारख यांसारखे खेळाडू यंदाच्या आयपीएलपर्यंत पोहोचले आहेत. त्याच धर्तीवर आता महिलांनाही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी 'NWPL' हा एक भक्कम मार्ग ठरेल, असा विश्वास विनोद शहा यांनी व्यक्त केला.
"महिला क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप देणे आणि महाराष्ट्राच्या संघासाठी दर्जेदार खेळाडू तयार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. नाशिकमधील क्रीडाप्रेमी आणि उद्योजकांनी या उपक्रमाला पाठबळ द्यावे."
— विनोद शहा, चेअरमन, NDCA
या स्पर्धेपूर्वी भव्य ट्रॉफी अनावरण, खेळाडूंचा लिलाव आणि उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे नाशिकची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक ठळक होणार असल्याचे सचिव समीर रकटे यांनी कळविले आहे.