नाशिक, (प्रतिनिधी) ७ मार्च - जीएसटी चौकशीत सवलत देण्यासाठी चक्क सव्वा कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य जीएसटी विभागाच्या उपायुक्तासह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईत सहाय्यक आयुक्ताचाही सहभाग निष्पन्न झाला असून, २० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना मुंबई एसीबीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयावर जीएसटी विभागाने यापूर्वी धाड टाकली होती. या प्रकरणातील तपास लवकर पूर्ण करण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे (४७) आणि राज्य कर सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे (५५) यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १ कोटी २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती हा आकडा १ कोटी रुपयांवर निश्चित झाला.
अशी झाली कारवाई
तक्रारदाराने या मोठ्या मागणीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. शुक्रवारी (६ मार्च) नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात एसीबीने सापळा रचला. उपायुक्त पागे आणि सहाय्यक आयुक्त दोंदे यांच्यावतीने अमित हिरामण जाधव (३६) या खाजगी व्यक्तीने लाचेचा पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये स्वीकारले. यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने जाधवला रंगेहात पकडले.
मुख्य आरोपी फरार?
या कारवाईनंतर एसीबीने सोमनाथ पागे आणि अमित जाधव यांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील दुसरा मुख्य अधिकारी सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे याचा शोध सुरू असल्याचे समजते. पागे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता सुमारे २ लाख रुपयांची रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी लाचखोरीची कारवाई मानली जात आहे. सव्वा कोटींचे मागणी प्रकरण ऐकून महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.