त्र्यंबक रोडवर दोन कारचा भीषण अपघात... ३५ वर्षीय तरुण ठार

Share:
Main Image
Last updated: 06-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ मार्च - त्र्यंबक रोडवरील वासळी फाटा परिसरात दोन कारच्या विचित्र अपघातात एका ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या या तरुणाला भरधाव कारने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण पंडीत लहांगे (वय ३५, रा. वासळीगाव, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रविण हा २७ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त सातपूर येथे आला होता. दुपारी काम आटोपून तो घराकडे परतत असताना वासळी फाटा कमानीजवळ उभा होता.
त्याचवेळी त्र्यंबक रोडने जाणाऱ्या स्विफ्ट कारने (MH 15 DS 0477) समोरून जाणाऱ्या वरना कारला (MH 18 BC 8019) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवीण लहांगे याला भीषण धडक दिली.

Advertisement

उपचारादरम्यान मृत्यू
या भीषण अपघातात प्रवीण गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वासळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस कारवाई
याप्रकरणी मृताचे वडील पंडीत लहांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी स्विफ्ट कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार बनकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet.