सासरच्या जाचाला कंटाळून २९ वर्षीय विवाहितेची आत्महत्या... पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा...

Share:
Last updated: 06-Mar-2026

​नाशिक, (प्रतिनिधी) ६ मार्च - वडाळा-पाथर्डी मार्गावरील साईनाथनगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २९ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दिराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, विद्या सौरभ सानप (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. बुधवारी (दि. ४) रात्री विद्या यांनी आपल्या राहत्या घरात 'सेल्फॉस' नावाचे विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नाशिकमधील नारायणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, मध्यरात्री उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. अमर पवार यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Advertisement

​सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
​या प्रकरणी मृत विद्या यांचे वडील संजय रामप्रसाद सांगळे (रा. काथरगाव, ता. निफाड) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सासरच्या मंडळींकडून विद्या यांना सतत घालून-पाडून बोलले जात असे. या मानसिक छळाला कंटाळूनच आपल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप सांगळे यांनी केला आहे.

​यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
​सौरभ सानप (पती)
​शैला सानप (सासू) यांनी 
​हर्षद सानप (दीर)
(सर्व राहणार: ज्योती निसर्ग अपार्टमेंट, साईनाथनगर, नाशिक)
​या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

........
नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर भागात घडली असून या घटनेत २० ग्रॅम वजनाच्या व सुमारे १ लाख ४० हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमिला संजय नागरे (रा.अशोका पार्क शिवाजीनगर जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नागरे या गुरूवारी (दि.५) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. नारायण बापू नगर येथील घरोंदा इमारतीसमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील एक लाख ४० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

Comments

No comments yet.