नाशिक, (प्रतिनिधी) ६ मार्च - शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर पंचवटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलाखाली रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
अकसाद आलम (वय ३१, रा. हरिनीया खाजसपूर, बिहार) असे मृत तरुणाचे नाव आहे. अकसाद हा मंगळवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास द्वारकाकडून आडगाव नाक्याच्या दिशेने पायी जात होता. पंचवटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलाखालून जात असताना एका अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली.
उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातात अकसादच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याला तातडीने नजीकच्या सिल्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, मध्यरात्री उपचार सुरू असताना डॉ. दर्शन देसले यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
याप्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास करत असून, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेतला जात आहे. हवालदार पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नाशिक : दिंडोरीरोडवरील पोकार कॉलनीत राहाणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन सिताराम खाडे (रा.रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ,पोकार कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खाडे याने मंगळवारी (दि.३) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार गोसावी तपास करीत आहेत.