पुणे, (प्रतिनिधी) ६ मार्च - अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाला कारणीभूत असलेल्या #VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याच्या CID चौकशीवरून आता नवा वाद पेटला आहे. व्ही. के. सिंगला चौकशीसाठी बोलावले होते की शाही पाहुणचारासाठी? असा जळजळीत सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला दिलेल्या कथित विशेष वागणुकीमुळे तपासाच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आठ तासांचा 'बडदास्त' ड्रामा?
रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्ही. के. सिंग सकाळी ११ वाजता CID कार्यालयात हजर झाला होता. त्याची तब्बल आठ तास चौकशी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची 'बडदास्त' राखण्यातच गेल्याची चर्चा आहे. रात्री उशिरा त्याला पोलिसांच्या काळ्या काचा असलेल्या गाडीतून एखाद्या 'व्हीआयपी' पाहुण्याप्रमाणे सोडण्यात आले. यावरून संशयाची सुई अधिक गडद झाली आहे.
रोहित पवारांचे मुख्य सवाल:
काळ्या काचांचा पडदा कशासाठी? काळे कारनामे करणाऱ्याला वाचवण्यासाठी पोलिसांच्या गाडीचा वापर का केला गेला? यामागे नक्की काय 'काळंबेरं' आहे?
FIR ला नकार का? पीडित पक्षाचा कायदेशीर हक्क असूनही या अपघाताबाबत अद्याप FIR का नोंदवला जात नाही?
कोणाचा आशीर्वाद? ज्याच्या कंपनीच्या विमानामुळे एका मोठ्या नेत्याचा जीव गेला, त्याला कोणाच्या वरदहस्तामुळे ही 'व्हीआयपी' ट्रीटमेंट दिली जात आहे?
पत्रकारांनाही पोलिसांकडून मज्जाव
या प्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी अत्यंत चुकीची वागणूक दिल्याचे समोर आले आहे. माहिती दडपण्याचा प्रयत्न का होतोय, असा सूर आता माध्यम वर्तुळातून उमटत आहे. एकीकडे सर्वसामान्य जनतेला न्यायासाठी वणवण करावी लागते, तर दुसरीकडे गंभीर प्रकरणात संशयित असलेल्या उद्योगपतीला पोलीस संरक्षण आणि सुविधा पुरवल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
आता या आरोपांवर CID प्रशासन किंवा गृह मंत्रालय काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. सत्तेत बसलेले अजितदादांचे तथाकथित 'विश्वासू' आमदार आतातरी जागे होणार का?"
— रोहित पवार, आमदार