नाशिक, (प्रतिनिधी) ६ मार्च - नाशिककरांची जीवनवाहिनी असलेल्या 'सिटीलिंक' (नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.) तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला प्रवाशांसाठी एका विशेष 'लकी ड्रॉ' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील १५ भाग्यवान विजेत्या महिलांना मार्च महिनाभर सिटीलिंक बसमधून मोफत प्रवासाची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अशी आहे स्पर्धा
ही स्पर्धा ६ आणि ७ मार्च २०२६ असे दोन दिवस चालणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी महिला प्रवाशांनी आपला बस प्रवास पूर्ण झाल्यानंतर तिकिटाच्या मागे स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहून ते तिकीट निर्धारित केंद्रांवरील लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकायचे आहे.
लकी ड्रॉ बॉक्सची ठिकाणे:
१. नाशिक रोड बसस्थानक
२. सिव्हिल हॉस्पिटल (नवीन सीबीएस)
३. पंचवटी कारंजा
विजेत्यांची निवड प्रक्रिया
तिकीट धारक: पेटीत जमा झालेल्या तिकिटांमधून १० भाग्यवान महिलांची निवड केली जाईल.
पास धारक: सिटीलिंकचा पास वापरणाऱ्या महिलांसाठीही स्वतंत्र ड्रॉ असून, त्यातून ५ भाग्यवान महिलांची निवड होईल.
अशा एकूण १५ महिलांना उर्वरित मार्च महिना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल.
'आय राइड विथ प्राइड' सेल्फी पॉइंट
केवळ स्पर्धाच नाही, तर महिला प्रवाशांचा उत्साह वाढवण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि पंचवटी कारंजा येथे “I Ride With Pride – CITILINC” या थीमवर आकर्षक सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. महिलांनी येथे आपले फोटो काढून #citilincwithher या हॅशटॅगसह सोशल मीडियावर टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि महिला प्रवाशांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नाशिकमधील जास्तीत जास्त महिला भगिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा."
— प्रशासन, सिटीलिंक