नाशिक, (प्रतिनिधी) ६ मार्च - हातउसनवार पैसे दिले नाही, या किरकोळ कारणावरून तीन जणांच्या टोळक्याने एका २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरूळ परिसरातील पीव्हीजी (PVG) कॉलेजच्या गेटवर घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
सिद्धार्थ सुनील ठाकूर (वय २२, रा. गणेशनगर, म्हसरूळ) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अनिकेत मोरे व त्याचे दोन साथीदार आणि फिर्यादी सिद्धार्थ हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सोमवारी (दि. २) रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयितांनी सिद्धार्थला फोन करून म्हसरूळ येथील पीव्हीजी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर बोलावून घेतले.
पैसे नाकारल्याने भडकला राग
सिद्धार्थ कॉलेजच्या गेटवर पोहोचला असता, संशयित अनिकेत मोरे व त्याच्या साथीदारांनी त्याच्याकडे ६०० रुपये हातउसनवार मागितले. मात्र, आपल्याकडे सध्या पैसे नसल्याचे सिद्धार्थने त्यांना सांगितले. याचा राग अनावर झाल्याने संशयित त्रिकुटाने त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयितांनी सिद्धार्थला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तरूण गंभीर जखमी; उपचार सुरू
या मारहाणीत सिद्धार्थच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी अनिकेत मोरे व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.