मुलींना सैन्यदलात जाण्याची सुवर्णसंधी... मिळणार मोफत प्रशिक्षण...

Share:
Main Image
Last updated: 07-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ मार्च - नाशिकमधील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी मुलींसाठी सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. १०१ व्या सत्रासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, इच्छुक पात्र उमेदवारांना २४ मार्च २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप आणि सुविधा
हे प्रशिक्षण पूर्णतः निवासी असून त्याचा कालावधी ४ महिने इतका आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना खालील सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत:
निवास व भोजन: राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय.
साहित्य: मोफत गणवेश आणि ग्रंथालय सुविधा.
प्रशिक्षण: आधुनिक व्यायाम शाळा (Gym) आणि सामान्य ज्ञानासह मैदानी चाचणीचे मार्गदर्शन.

Advertisement

पात्रतेचे निकष
या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या तरुणींकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
शिक्षण: किमान १२ वी उत्तीर्ण.
प्रवर्ग: अनुसूचित जमाती (ST).
वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे.
शारीरिक निकष: उंची किमान १५० सें.मी. आणि वजन ४८ किलो.
आवश्यक कागदपत्रे: शाळा सोडल्याचा दाखला, १० वी व १२ वी गुणपत्रक, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र आणि नाव नोंदणी प्रमाणपत्र.

निवड प्रक्रिया आणि संपर्क
प्रशिक्षणाचे नवीन सत्र १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्राप्त अर्जांमधून उमेदवारांची निवड करण्यासाठी २५ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता शारीरिक व बौद्धिक चाचणी घेतली जाणार आहे.

अर्ज कुठे कराल?
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, पेठ रोड, नाशिक येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख (९४२०२६९०२३) किंवा उपकेंद्रप्रमुख (८००७९८०९१६) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Comments

No comments yet.