नाशिक, (प्रतिनिधी) ५ मार्च - शहरातील गंगापूर रोड परिसरात महागडी कार खरेदी-विक्री करण्याच्या व्यवहारात मुंबईतील एका व्यक्तीची ३८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताने वाहनावरील कर्जाची परतफेड न करता, उलट फिर्यादीकडे अधिकच्या पाच लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज दिनकर शेवरे (रा. अंधेरी, मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शेवरे यांनी गेल्या जुलै महिन्यात नाशिकमधील 'पॉप्युलर कार मॉल'च्या माध्यमातून समीर सर्जेराव जाधव-पाटील (रा. सहदेवनगर, गंगापूर रोड) यांच्याकडून 'फॉर्च्युनर' कार (क्रमांक: MH 15 JJ 0007) खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. हा व्यवहार एकूण ३८ लाख रुपयांत ठरला होता.
असा झाला व्यवहार:
फिर्यादी शेवरे यांनी संशयित जाधव-पाटील याला २१ लाख रुपये RTGS द्वारे दिले.
वाहनावरील थकीत कर्ज फेडण्यासाठी उर्वरित १७ लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.
असा एकूण ३८ लाख रुपयांचा व्यवहार पूर्ण झाला होता.
कर्ज न फेडता दिली धमकी
व्यवहार झाल्यानंतर संशयित समीर जाधव-पाटील याने ठरल्याप्रमाणे वाहनावरील कर्जाची परतफेड केली नाही. सहा-सात महिने उलटूनही व्यवहार पूर्ण न झाल्याने शेवरे यांनी पैशांचा तगादा लावला. या रागातून संशयिताने शेवरे यांची भेट घेऊन, "अजून ५ लाख रुपये द्या, नाहीतर कार परत करा," असे म्हणत धमकावले. मागणी पूर्ण न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी समीर जाधव-पाटील याच्याविरुद्ध फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील करत आहेत.