नाशिकमध्ये होणार ‘कृषीकुंभ २०२६... आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा जागर...

Share:
Main Image
Last updated: 05-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ मार्च - नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘कृषीकुंभ २०२६ - नाशिक जिल्हा कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा (ATMA) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कृषी महोत्सव  १२ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत नाशिक येथील युथ फेस्टिवल मैदान (बळी मंदिर चौक, पार्कसाईट शेजारी) येथे आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त  शेतकरी बांधव, महिला शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, कृषी उत्पादक कंपन्या यांनी महोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, आत्माचे प्रकल्‍प संचालक अभिमन्यू काशिद, यांच्यासह अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी कृषीकुंभ 2026 च्या आयोजनाबाबत तसेच या 5 दिवसीय प्रदर्शनात होणारे विविध उपक्रमांची माहिती यावेळी खालीलप्रमाणे विषद केली. यावेळी ‘कुषीकुंभ 2026’ लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले.

अशी आहेत 'कृषीकुंभ 2026' ची वैशिष्ट्ये

शेतीचे भविष्य: AI आणि ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक: 
यंदाचा कृषीकुंभ केवळ प्रदर्शन नसून ते आधुनिक शेतीचे 'विद्यापीठ' ठरणार आहे. महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) शेतीतील वापर. केवळ चर्चा न करता, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली AI तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. तसेच, शेतीची कामे सुलभ करणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचे लाइव्ह डेमो या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

४०० हून अधिक स्टॉल्स आणि नाविन्यपूर्ण संकल्पना:
या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यामध्ये बियाणे, खते, कीटकनाशके, यांत्रिकीकरण या पारंपरिक विषयांसोबतच खालील नाविन्यपूर्ण दालने असतील.

 शेतीतील जुगाड ते तंत्रज्ञान: 
 शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण अवजारांची स्पर्धा आणि प्रदर्शन. यासाठी शेतकऱ्यांना आपले तंत्रज्ञान घेऊन सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 अन्नप्रक्रिया विशेष दालन: 
प्रक्रिया उद्योजक, मशिनरी उत्पादक, बँका यांचे दालन आणि शासकीय योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील.

 नैसर्गिक शेती व बायोचार: 
पर्यावरणापूरक शेतीसाठी बायोचार,10-ड्रम थेरी आणि नैसर्गिक शेतीचे विशेष मॉडेल आणि प्रात्यक्षिक सुद्धा असणार आहे.

Advertisement

हायड्रोपोनिक्स व मत्स्यपालन: 
कमी जागेत अधिक उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स आणि शेततळ्यातील मत्स्यपालनाचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण.

याशिवाय सोलर ड्रायर, पाणलोटचे प्रत्यक्ष मॉडेल, जलताराचे प्रत्यक्ष मॉडेल ,मधमाशी पालन मॉडेल, ग्रेप कव्हर, फ्रुट कव्हर मॉडेल, आधुनिक कांदाचाळ, मशरूम, रेशीम, मोबाईल माती परीक्षण, हवामान केंद्रे, मुरघास, हनी पार्क इत्यादी प्रत्यक्ष पाहणी करता येणार आहे. यांत्रिकीकरण मध्ये सर्व प्रकारचे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत नाविन्यपूर्ण यंत्रे पहावयास मिळतील.

महिला शेतकरी सन्मान आणि सांस्कृतिक मेजवानी
'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' निमित्त या महोत्सवात महिला शेतकऱ्यांच्या योगदानाचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रयोगशील शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) सन्मानित केले जाईल.13,14 व 15 मार्च 2026 रोजी दररोज दुपारी 1 वाजता तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व शेतीकरी बांधवांचा सन्मान होणार आहे. केवळ ज्ञानच नव्हे, तर मनोरंजनाचीही मेजवानी शेतकरी बांधव व नाशिककरांना मिळणार आहे. संध्याकाळच्या सत्रात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(14 मार्च) फेम कलाकारांचे कार्यक्रम आणि 'फोक लोक' (15 मार्च) हा पारंपरिक लोककलेचा अविष्कार प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

नाशिकची 'खाऊ गल्ली' आणि धान्य महोत्सव तसेच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री दालन.
भेट देणाऱ्या नागरिकांसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची 'खाऊ गल्ली' हे विशेष आकर्षण असेल. यासोबतच थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार धान्य खरेदी करण्यासाठी 'धान्य महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांच्यात थेट दुवा साधला जाईल.

शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी
शेतकऱ्यांना शासकीय योजनांसाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी प्रदर्शनात थेट अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी पतपुरवठा, यांत्रिकीकरण आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत बँकांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील.

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायती मधील शेतकऱ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी आणण्याचे नियोजन करण्यात आले असून सर्व सरपंचांना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र देण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व कृषी विभागाचे आवाहन:
 "नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्याने या महोत्सवात सहभागी व्हावे. शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न मानता तो एक प्रगत व्यवसाय कसा बनवता येईल, याचे दिशादर्शन कृषीकुंभ २०२६ मध्ये मिळेल."

‘कृषी कुंभ’ 2026 युथ फेस्टिवल मैदान, पार्कसाईट शेजारी, बळी मंदिर चौक, नाशिक येथे 12 ते 16 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.

Comments

No comments yet.