येवला, (प्रतिनिधी) ५ मार्च - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये डिजिटल ग्रंथालय सुरू करण्याच्या योजनेअंतर्गत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील महात्मा जोतीराव फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे डिजिटल ग्रंथालय सुरू करण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षापासून येवला आयटीआयमध्ये डिजिटल ग्रंथालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील निवडक चार आयटीआयमध्ये ही योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये येवला येथील संस्थेचा समावेश आहे.
सदर डिजिटल ग्रंथालयासाठी संगणक, आवश्यक फर्निचर, डिजिटल साधनसामग्री व इतर साहित्य खरेदी करण्यात येणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना अद्ययावत तांत्रिक माहिती, ई-पुस्तके, ऑनलाईन संदर्भ साहित्य व अभ्यासक्रमाशी संबंधित डिजिटल साधनांचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळून त्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम बनविण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे येवला परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, तांत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तेत भर पडणार आहे. या डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून येवला आयटीआयच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.