नाशिक, (प्रतिनिधी) ५ मार्च - जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने विदर्भ वरील विजयात आपल्या जोरदार फलंदाजीची चमक दाखवत ९४ धावा फटकवल्या व विजयाला मोठा हातभार लावला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सध्या विविध ठिकाणी खेळवली जात आहे.
पुदुचेरी येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात विदर्भ संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २१० धावा केल्या. मानसी पांडेने सर्वाधिक ४९ धावा केल्या. महाराष्ट्राच्या गायत्री सुर्वसेने ४ व अक्षया जाधवने २ बळी घेतले.
महाराष्ट्राने विजयासाठीच्या २११ धावा ईश्वरी सावकारच्या दमदार ९४ धावांच्या जोरावर ४६ व्या षटकात पार केल्या. सलामीला खेळत ईश्वरीने १२८ चेंडूत १० चौकार मारले. तिला ईश्वरी अवसरे ५८ व खुशी मुल्ला ३३ धावा अशी साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्राने ७ गडी राखून मोठा विजय मिळवला.
या महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील पुदुचेरी येथे नियोजित महाराष्ट्राचे साखळी सामने पुढील प्रमाणे - ५ मार्च - झारखंड ,७ मार्च - हरयाणा , ९ मार्च - त्रिपुरा , ११ मार्च - तमिळनाडु.