शिर्डी साई संस्थानच्या माजी अध्यक्षांकडून बाबांना मौल्यवान भेट... चर्चा तर होणारच...

Share:
Main Image
Last updated: 04-Mar-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) ४ मार्च - शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत साईबाबांच्या चरणी मोठे सुवर्णदान अर्पण केले आहे. एकूण ४६ लाख ९ हजार ७४ रुपये किमतीची, कलात्मक नक्षीकाम असलेली सहा सुवर्ण 'ॐ' अक्षरे त्यांनी संस्थानला भेट दिली आहेत.

समाधी मंदिरात सुवर्ण झळाळी
डॉ. हावरे यांनी अर्पण केलेली ही सहा सुवर्ण 'ॐ' अक्षरे एकूण ३०९.५०० ग्रॅम वजनाची आहेत. ही अक्षरे अत्यंत आकर्षक आणि कलात्मक पद्धतीने घडवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही सुवर्ण अक्षरे साईबाबांच्या समाधी मंदिरात श्रींच्या मूर्तीमागील भिंतीवर (बॅकरेस्ट) लावण्यात आली असून, यामुळे गाभाऱ्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

Advertisement

संस्थानतर्फे गौरव
या दानाबद्दल साईबाबा संस्थानच्या वतीने डॉ. सुरेश हावरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थानचे इतर अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबांच्या चरणी ही सेवा अर्पण करताना मनस्वी आनंद होत आहे," अशी भावना डॉ. सुरेश हावरे यांनी यावेळी व्यक्त केली.

साईबाबांच्या चरणी दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात दान येत असते, मात्र संस्थानच्याच एका माजी अध्यक्षांनी दिलेल्या या मौल्यवान भेटीची सध्या शिर्डीत मोठी चर्चा आहे.

Comments

No comments yet.